धोटे बंधू विज्ञान महाविद्यालय, गोंदिया येथे रासेयो स्थापना दिन उत्साहातलोकशाही एक्सप्रेस न्यूज नेटवर्क गोंदिया

लोकशाही एक्सप्रेस न्यूज नेटवर्क गोंदिया 
धोटे बंधू विज्ञान महाविद्यालय, गोंदिया येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाने २४ सप्टेंबर २०२५ रोजी रासेयो स्थापना दिन मोठ्या उत्साहात व सामाजिक जबाबदारीच्या भावनेने साजरा केला. हा कार्यक्रम गोंदिया शिक्षण संस्थेचे सचिव राजेंद्र जैन व संचालक निखिल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.
या सोहळ्यास डॉ. अंजन नायडू प्राचार्य, प्रा. विजय सोनी गणित विभाग प्रमुख, डॉ. मनोज पटले आयक्यूएसी समन्वयक, डॉ. जी. पी. गाडेकर प्राणीशास्त्र विभाग प्रमुख व प्रा. राजकुमार एम. पटले रासेयो कार्यक्रम अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्राचार्य डॉ. अंजन नायडू यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात, शिस्त, एकता आणि समाजसेवेच्या मूल्यांची जडणघडण करण्यात रासेयोची भूमिका अधोरेखित केली. त्यांनी असेही सांगितले की युवकांमध्ये नेतृत्वगुण विकसित करते व त्यांना समाजाप्रती आपली जबाबदारी समजावून देते.
डॉ. जी. पी. गाडेकर यांनी समाजनिर्मितीसाठी समाजसेवेचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी स्वयंसेवकांना स्वच्छता, आरोग्य व साक्षरतेबाबत ग्रामीण तसेच शहरी भागात जनजागृती करण्याचे आवाहन केले. “स्वतःसाठी नव्हे, तर इतरांसाठी” या ब्रीदवाक्याला अनुसरून कार्य करण्याची प्रेरणा त्यांच्या भाषणातून मिळाली.
कार्यक्रमादरम्यान रासेयो स्वयंसेवकांनी प्रा. विजय सोनी यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल व विद्यार्थ्यांना सातत्याने प्रोत्साहन दिल्याबद्दल “उत्कृष्ट प्राध्यापक ” हा मानाचा बहुमान देऊन गौरव केला. हा सन्मान विद्यार्थ्यांच्या त्यांच्या शिक्षकांबद्दल असलेल्या आदर व कृतज्ञतेचे प्रतिक ठरला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्साहपूर्ण पद्धतीने रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. के. पी. घोषाल यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. शुभम अंबिलकर, प्रा. खुशबू पर्धी व रासेयो स्वयंसेवकांच्या संपूर्ण टीमने मोलाचे योगदान दिले. सुमारे १३० रासेयो स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या सांस्कृतिक व जनजागृतीपर उपक्रमांमुळे कार्यक्रम अधिक प्रभावी ठरला. शेवटी पाहुणे, शिक्षकवर्ग व स्वयंसेवकांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.