लोकशाही एक्सप्रेस न्यूज भंडारा
साकोली येथील नागझिरा-नवेगाव व्याघ्र राखीव क्षेत्र कार्यालयासमोर व्याघ्रप्रकल्पातंर्गत जंगलात काम करीत असलेल्या वनमजुरांनी काम बंद करून आपल्या मागण्यांसाठी आज, सोमवारी आंदोलन करीत मागण्यांकडे लक्ष वेधले. या आंदोलनात ५० हून अधिक वनमजुरांनी भाग घेतला.
महाराष्ट्र राज्य वनरक्षक, वनपाल व वनकर्मचारी संघटनेचे केंद्रीय संघटक ललीत उचिबगले यांच्यानुसार वनमजुरांना आठ तासापेक्षा जास्त वनमजुरांना कामे देण्यात येऊ नये, असे शासनाचे आदेश आहेत. परंतु, वनमजुरांना २४ तास कामाच्या ठिकाणी राहावे लागते. वन परिक्षेत्र अधिकारी ए. व्ही लांबट यांनी वनमजुरांच्या ३० किलोमीटरपर्यंत बदल्या केल्या आहेत. वनरक्षकांना विश्वासात घेऊन या बदल्या करायला हव्या होत्या. कोणता वनमजूर कोणत्या प्रकारची कामे करतो, याची जाणीव वनरक्षक, वनपाल यांना असते. परंतु, लांबट यांनी हेतूपरस्पर वनमजुरांना त्रास देण्यासाठी बदल्या केल्या आहेत. वनमजूर हे २४ तास जंगलात कामे करतात. मात्र, त्यांच्याकडे ओळखपत्र नसते. अशावेळी ओळखपत्र नसल्याने संशयित म्हणून पोलिस वनमजुरांनाच घेऊन जातात. त्यामुळे मजुरांना हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. वनमजुरांच्या सेवाज्येष्ठता याद्या तयार केल्या गेल्या आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी केली जात नाही. नागझिऱ्यात बरेच वनमजूर काम करतात. त्यांच्या मागण्यांसाठी हे आंदोलन करावे लागले, असल्याचे त्यांनी सांगितले