फळे व रोपवाटिका,मशरुम उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षणाचे आयोजन लोकशाही एक्सप्रेस

         लोकशाही एक्सप्रेस 
 गोंदिया, दि.२० : महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, साखर संकुल शिवाजीनगर पुणे, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे व कृषि विज्ञान केंद्र हिवरा गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय निवासी फळे व रोपवाटिका तंत्रज्ञान आ‍णि मशरुम उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण वर्गाचे आयोजन कृषि विज्ञान केंद्र हिवरा, गोंदिया येथे करण्यात आले. 
        कार्यक्रमास तहसिलदार समशेर पठाण, प्रकल्प संचालक आत्मा अजित अडसुळे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी निलेश कानवडे, कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख   डॉ.विशाल उबरहंडे, प्रशिक्षण महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ विभाग प्रमुख दिगंबर साबळे, उद्यानविद्या विषय तज्ञ डॉ.विजय कोरे, मनुष्यबळ विकास तथा वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे हेमंत जगताप, दिपक बेदरकर, विकास कटरे आदी मान्यवर उपस्थित होते.
       यावेळी तहसिलदार समशेर पठाण यांनी गोंदिया जिल्ह्यातील जास्तीत जास्त नवउद्योजक शेतकऱ्यांनी दोन्ही प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. अजित अडसुळे यांनी आत्मा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रशिक्षण कार्यक्रमांची सविस्तर माहिती दिली. निलेश कानवडे यांनी कृषि विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजना शेतकऱ्यांना समजावून सांगितल्या.
       दिगंबर साबळे यांनी प्रास्ताविकामध्ये दोन्ही प्रशिक्षण कार्यक्रमाचे महत्व विशद करुन महामंडळामार्फत भविष्यातही असे उपक्रम या ठिकाणी राबवले जातील असे आश्वासित केले. हेमंत जगताप यांनी महामंडळाला अशाप्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यासाठी महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ पुणे यांनी संधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल कृषि विभागाचे आभार व्यक्त केले.
       रोपवाटिका व मशरुम दोन्ही प्रकारच्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये उपस्थित शेतकऱ्यांना तांत्रिक सत्रा बरोबरच प्रात्यक्षिक ज्ञानही दिले गेले. प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप कृषि विज्ञान केंद्र हिवरा डॉ.विशाल उबरहंडे, दिगंबर साबळे व डॉ.विजय कोरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
       प्रशिक्षण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन हेमंत जगताप यांनी केले. सदर प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये गोंदिया जिल्ह्यातील 90 हून अधिक शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषि विज्ञान केंद्र गोंदिया, कृषि विभाग व आत्मा गोंदिया यांचे सहकार्य लाभले.