गोंदिया, 17 जुलै २०२५: महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आज गोंदिया जिल्ह्यातील झाशीनगर उपसा सिंचन योजनेच्या ३० वर्षांपासून प्रलंबित कामाचा आणि डोंगरगाव वितरेकेच्या निकृष्ट बांधकामाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. अर्जुनी मोरगावचे आमदार राजकुमार बडोले यांनी हा प्रश्न विधानसभेत मांडला. झाशीनगर उपसा सिंचन योजनेचे केवळ १० टक्के काम शिल्लक असूनही, राखीव वन, अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यान अशा वनजमिनीच्या वारंवार बदलणाऱ्या दर्जामुळे प्रकल्प पूर्णत्वास येत नाही. याशिवाय, डोंगरगाव वितरेकेच्या बांधकामात अनियमितता आढळून आली आहे. अवघ्या एका वर्षात बांधकाम खचल्याने कोल्हापूरच्या स्वस्तिक कंस्ट्रक्शन कंपनीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यासंदर्भात बांधकामातील अनियमिततेची चौकशी आणि चुकीची उत्तरे देऊन दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी आमदार बडोले यांनी केली.
आमदार बडोले यांनी सुचवले की, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ३० मीटर दगड हटवणे शक्य आहे, ज्यासाठी वनविभागाने मान्यता दिलेली आहे. यामुळे ३,५०० हेक्टर जमिनीला सिंचनाचा लाभ मिळू शकेल. यावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी बैठक घेऊन मार्ग काढण्याचे आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून हा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. आमदार राजकुमार बडोले यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधत गोंदिया जिल्ह्याच्या शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचा प्रयत्न केला आहे.