गोंदियात सोमवारी आदिवासी आरक्षण बचावासाठी भव्य आक्रोश मोर्चा लोकशाही एक्सप्रेस गोंदिया

    लोकशाही एक्सप्रेस गोंदिया 
 आदिवासी समाजाच्या आरक्षणात इतर समाजांकडून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी गोंदिया येथे सोमवारी 6 ऑक्टोबर 2025 रोजी भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. संयुक्त आदिवासी कृती समिती गोंदिया व  विविध आदिवासी संघटनांच्या नेतृत्वात हा मोर्चा  इंदिरा गांधी स्टेडियम येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार आहे. आदिवासी आक्रोश मोर्चाला काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनसोड, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट )पक्षाचे जिल्हाध्यक्ष सौरभ रोकडे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा. सतीश बनसोड व इतर राजकीय पक्षाकडून जाहीर समर्थन  असल्याची माहिती ही देण्यात आली आहे.
आदिवासी समाजाच्या आरक्षणावर बंजारा आणि धनगर समाजाकडून हैदराबाद गॅझेटच्या आधारावर दावा केला जात आहे. या दोन्ही समाजांना स्वतंत्र आरक्षण असताना, ते आदिवासी समाजात समाविष्ट होऊन आरक्षण मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप संयुक्त आदिवासी कृती समितीने केला आहे. बंजारा आणि धनगर समाज आदिवासींचे निकष पूर्ण करत नसून, त्यांना आदिवासी आरक्षणात समाविष्ट करणे भारतीय संविधानाच्या विरोधात आहे, असे समितीचे म्हणणे आहे
आदिवासी समाज हा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीयदृष्ट्या मागासलेला आहे. जर बंजारा , धनगर व इतर गैरआदिवासी समाजाला आदिवासी आरक्षणात समाविष्ट केले, तर मूळ आदिवासी समाजाच्या हक्कांवर गदा येईल आणि त्यांची परिस्थिती आणखी बिकट होईल, अशी भीती समितीने व्यक्त केली आहे. यामुळे आदिवासी समाजाने एकजुटीने या मोर्चात सहभागी होऊन आपले हक्क आणि अस्तित्वाचे संरक्षण करावे, असे आवाहन आदिवासी संयुक्त  कृती समिती गोंदिया  व आदिवासीच्या विविध संघटनांनी केले आहे.

⏹️ या आहेत प्रमुख मागण्या
बंजारा व इतर कोणत्याही जातीला अनुसूचित जमाती प्रवर्गात समावून घेण्यात येऊ नये 

राज्यातील अनुसूचित जमातीच्या अनुशेष तात्काळ भरण्यात यावा
 
आदिवासी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना दिली जाणारी डीबीटी योजना बंद करून शासकीय खानावळ सुरू करण्यात यावी 

आदिवासीच्या जमिनी गैर आदिवासींना भाडेतत्त्वावर देण्यात येऊ नये 

शैक्षणिक किंवा इतर क्षेत्रांमध्ये जात वैधता प्रमाणपत्राशिवाय कोणतेही लाभ देण्यात येऊ नये या मागण्यासह इतर दहा मागण्यांच समावेश आहे 
⏹️ मोर्चात 50 हजार पेक्षा अधिक आदिवासी  होणार सामील 
आक्रोश मोर्चा एवढा विशाल होणार आहे की या मोर्चात आदिवासी समाजाचे 50 हजार पेक्षा अधिक मोर्चेकरी सामील होणार असल्याची प्राथमिक माहिती आहे.यासाठी  संयुक्त आदिवासी कृती समितीच्या वतीने जिल्ह्यातील प्रत्येक गावा गावात जाऊन जनजागृती चे काम करण्यात येत आहे .माहिती अशी ही आहे की या मोर्चासाठी 500 ते 600 पेक्षा अधिक वाहनांची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे.