लोकशाही एक्सप्रेस न्यूज गोंदिया
नवेगावबांध येथे मंडल जनजागृती यात्रेच्या पार्श्वभूमीवर एक भव्य प्रबोधन मेळावा आयोजित करण्यात आला. यामध्ये ओबीसी युवा अधिकार मंचाचे प्रमुख संयोजक खेमेंद्र कटरे यांनी ओबीसी समाजाच्या विकासासाठी जातनिहाय जनगणना ही अत्यावश्यक असल्याचे ठासून सांगितले.ते म्हणाले की, "अनुसूचित जाती-जमातींप्रमाणेच ओबीसी समाजासाठीही आगामी जनगणनेत स्वतंत्र कॉलमची नोंद असलेला तक्ता हवा. अन्यथा ओबीसी समाजाची खरी लोकसंख्या समोर येणार नाही आणि निधीचे प्रमाणही कमी राहील."
त्यांनी शासनाला आवाहन केले की, ओबीसी समाजाच्या विकासासाठी योजनांची अंमलबजावणी करताना "डाटा आधारित धोरणे" आवश्यक आहेत. केंद्र व राज्य सरकारे फक्त आकड्यांच्या आधारेच निधी वितरित करतात. त्यामुळे आपल्या समाजाचा आकडा जनगणनेत ठळकपणे मांडला गेला पाहिजे, अशी भूमिका मांडण्यात आली.
नवेगावाबांध येथील प्रबोधन कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून यात्रेचे व ओबीसी युवा अधिकार मंचचे संयोजक उमेश कोराम उपस्थित होते.तसेच मंचावर ओबीसी अधिकार मंचचे संयोजक खेमेंद्र कटरे, सहसयोंजक कैलास भेलावे, गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक गंगाधर परशुरामकर,शिवसेना(उबाठा)गटाचे जिल्हाध्यक्ष शैलेष जायस्वाल,मंडल यात्रेतील सहयोगी सुभाष उके,हरिश्चंद्र लाडे,दिनेश हुकरे उपस्थित होते.
ग्रीन पार्क मैदानावर झालेल्या मेळाव्यात कटरे यांनी की, "सध्या राज्यभरात केवळ ५४ वसतिगृहं ओबीसी समाजासाठी कार्यरत आहेत, तर राज्यात ७२० तालुके आहेत. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात एक वसतिगृह सुरू करण्यासाठी आपल्याला एकत्र लढा उभारण्याची गरज आहे."त्यांनी येत्या १ ऑगस्टपासून सुरू झालेल्या ओबीसी वसतिगृह प्रवेश प्रक्रियेसाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरून शासनापर्यंत पोहोचण्याचे आवाहन केले. यामुळे शासनास ओबीसी विद्यार्थ्यांच्या गरजा समजतील आणि धोरण बदलास चालना मिळेल, असे मत त्यांनी मांडले.यावेळी यात्रेचे संयोजक उमेश कोराम यांनीही विचार व्यक्त केले.
ओबीसी युवा अधिकार मंचचे संयोजक उमेश कोराम यांनी पाच वर्षापासून मंडल यात्रा ही तळागाळातील लोकापर्यंत पोचून सामजिक न्याय व ओबीसी हक्कासाठी एक प्रभावी आवाज बनत आहे.ओबीसींना मंडल आयोगाच्या शिफारंशीसोबतच जातनिहाय जनगणना का महत्वाची हे पटवून देतांनाच सरकारने सुरु केलेल्या महाज्योती संस्थेची माहिती व ओबीसी वसतिगृहाची माहिती विद्यार्थ्यांसह पालकापर्यंत पोचविण्याकरीता प्रयत्न या यात्रेच्या माध्यमातून सुरु आहेत.
राजकीय आरक्षणासंबंधीही मुद्दे अधोरेखित
या वेळी शैलेश जयस्वाल यांनी ओबीसी समाजास राजकीय आरक्षण नसल्यामुळे भोगाव्या लागणाऱ्या अडचणींवर प्रकाश टाकला. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, "राजकीय संस्था, समित्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींचे प्रतिनिधीत्व नसल्यामुळे धोरणांमध्ये अन्याय होतो. हे थांबवायचे असेल, तर जातनिहाय जनगणना अनिवार्य आहे." जिल्हा बँकेचे संचालक गंगाधर परशुरामकर यांनीही ओबीसींच्या या सामाजिक आंदोलनात सर्वांनी मतभेद व पक्षभेद विसरुन सहकार्य करण्याची गरज असल्याचे साांगितले.
भव्य स्वागत व सहभागी संघटनांचा उत्तम प्रतिसाद
ओबीसी समाजाला मिळालेल्या घटनात्मक आरक्षणाच्या स्मरणार्थ ही यात्रा दरवर्षी काढली जाते. ओबीसी, भटके विमुक्त, एसबीसी समाजाच्या हक्कांसाठी ही यात्रा एक प्रभावी आवाज बनली आहे. मंडल यात्रेचे संयोजक उमेश कोराम व ओबीसी अधिकार मंचचे खेमेंद्र कटरे यांच्या नेतृत्वात निघालेल्या मंडल यात्रेचे भंडारा जिल्ह्यातून अर्जुनी मोरगाव तालुक्यातील धाबे टेकडी (आदर्श गाव) येथे पोहोचल्यावर ओबीसी अधिकार मंच, मराठा सेवा संघ, बहुजन युवा मंच आदी संघटनांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. अर्जुनी मोरगाव येथील शाळकरी विद्यार्थ्यांनीही उत्साहाने यात्रेचे स्वागत केले.
यांचीही होती उपस्थिती
कार्यक्रमाला भारतीय पिछडा शोषित संघटनेचे अध्यक्ष प्रेमलाल साठवणे,ओबीसी अधिकार मंचचे टोकेश हरिणखेडे,संविधान मैत्री संघटनेचे अतुल सतदेवे,संघर्ष वाहिनीचे प्रतिनिधी मनोज मेश्राम,अण्णाभाऊ साठे विश्व शाहीर परिषदेचे वसंत गवळी,भारतीय बौध्द महासभेचे मनोहर भावे,अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे मनोज बंसोड,राष्ट्रवादी काँग्रेस(शप)तालुकाध्यक्ष सुरेंश खोब्रागडे,बाबुलाल नेवारे,सामाजिक कार्यकर्ता रविचंद्र देशमुख,रामदास बोरकर,माजी जि.प.सदस्य किशोर तरोणे, मंडल जनजागृती यात्रेतील सहकारी शंकल पाल,ऋषीकेश खरात,सुधाकर मोधलकर,आकाश वैद्य,निखील सौंदलवाड,शुभम जुमदे,राष्ट्रवादी काँग्रेस शपचे मिथुन मेश्राम,रोशन बडोले यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.
समारोप
या यात्रेच्या निमित्ताने नवेगावबांध परिसरात ओबीसी समाजात नवचैतन्य निर्माण झाले आहे. शासनाकडे विविध मागण्या मांडण्यासाठी ही यात्रा हा एक महत्त्वाचा टप्पा ठरत आहे. आता हा आवाज तालुका ते दिल्ली पर्यंत पोहोचेल, अशी आशा व्यक्त करण्यात आली.संचालन अतुल सतदेवे यांनी केले,तर आभार मिथुन मेश्राम यांनी मानले.