पांगोली नदीवरील जीर्ण पुलाचे काम दहा दिवसात सुरू करा अन्यथा आंदोलन छेडणार

पांगोली नदीवरील जीर्ण पुलाचे काम दहा दिवसात सुरू करा अन्यथा आंदोलन छेडणार

गोंदिया,दि.24 : शहरातील भीमघाट पांगोली नदीवरील जीर्ण व धोकादायक पुलाच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना २०२१ पासून सातत्याने पाठपुरावा करीत आहे. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. या पुलावरून शेकडो नागरिक ये-जा करतात. मात्र तुटलेली रेलिंग, खड्डेयुक्त रस्ता रात्रीच्या अपुऱ्या व प्रकाशव्यवस्थेमुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे दहा दिवसात पुलाच्या बांधकाम प्रक्रियेला सुरुवात करावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.
मनसेने अनेक निवेदनांनंतर मंगळवारी (दि. २२) थेट सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता रामटेके यांच्याशी चर्चा करून पुलाचे तातडीने नूतनीकरण, तुटलेली रेलिंग बदलणे, खड्डे भरणे, रात्रीच्या सुरक्षेसाठी रेडियम पट्टया लावणे आणि सूचनाफलक बसवण्याची मागणी केली आहे. बांधकाम विभागाने यावर सकारात्मक प्रतिसाद देत १० दिवसांत काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. जर १० दिवसांत काम पूर्ण झाले नाही तर १ ऑगस्ट रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तसेच यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीला बांधकाम विभाग व शासन जबाबदार राहील, असा इशारा मनसेने दिला आहे.मनसेचे शहर अध्यक्ष सुरेश चौधरी, माजी शहर संघटक क्षितिज वैद्य, शहर उपाध्यक्ष सुमित कावळे, डिलेश उके, सोनू बावनथळे, शहर महासचिव माधव बनकर, छोटा गोंदिया शाखा अध्यक्ष कार्तिक राऊत, उपशाखा अध्यक्ष शुभम सहारे, दिनेश नेरकर, विकास बनकर, टोनेश बनकर, आयुष फुंडे, अनिकेत बुरडे यांच्यासह अनेक मनसैनिक उपस्थित होते.