मुख्यमंत्री सहायता निधीने दिले रुग्णाला नवे जीवनदान. लोकशाही एक्सप्रेस न्यूज नेटवर्क

लोकशाही एक्सप्रेस न्यूज नेटवर्क 
गोंदिया दि. 30 : देवरी तालुक्यातील पालांदूर येथील 58 वर्षीय राजकुमार दादू बारई यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने उपचारासाठी मोठा खर्च उचलणे कठीण होते. मात्र, मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या मदतीने त्यांच्या जीवनाला नविन दिशा मिळाली.
राजकुमार बारई यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांची रूग्णालयात तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये त्यांच्या हृदयात गंभीर त्रास असल्याचे निदान झाले. डॉक्टरांना तातडीने शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. ही शस्त्रक्रिया गोंदिया येथील युनाईटेड सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉ. दर्पण चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या करण्यात आली.
या शस्त्रक्रियेसाठी लागणारा सुमारे 90 हजार रुपयांचा खर्च मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामार्फत देण्यात आला. आर्थिक मदतीमुळे रुग्णाच्या कुटुंबावरचा आर्थिक भार कमी झाला आणि बारई कुटुंबात पुन्हा आनंद फुलला.
मुख्यमंत्री सहायता निधी मदत शक्य झाली ती गोंदिया येथील मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे अध्यक्ष तथा वैद्यकीय अधीक्षक डॉ. मुकेश येरपुडे, समाजसेवा अधीक्षक मारोती कुचनकर, लिपिक स्मिता शेटे आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या अथक प्रयत्नांमुळे.
राजकुमार बारई यांना सध्या हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला असून पुढील वैद्यकीय उपचार त्यांच्यावर सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून ते लवकरच पूर्णपणे बरे होतील, असा विश्वास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. रुग्णाचे पुत्र मुकेश राजकुमार बारई व त्यांच्या परिवाराने जिल्हा प्रशासनाचे मन:पूर्वक आभार मानले आहे.