लोकशाही एक्सप्रेस गोंदिया
शेतकरी व दिव्यांगासाठी नेहमी सरकारच्या विरोधात लढणाऱ्या प्रहार संघटनेच्या वतीने आता त्यांच्या मागणीला घेऊन थेट शमशान भूमीतच अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे.शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी, दिव्यांगांना दर महिन्याला सहा हजार रुपये मानधन देण्यात यावे, या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाने मंगळवारपासून (ता.१०) गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील नवेझरी येथील स्मशानभूमीत अन्नत्याग आंदोलनाला सुरवात केली आहे.
शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी, दिव्यांगांना दर महिन्याला सहा हजार रुपये मानधन देण्यात यावे, पेरणी ते कापणीपर्यंतची कामे नरेगामधून करण्यात यावी, भूमिहिन मजुराला पाच लाख रुपये अपघाती विमाकवच देण्यात यावे, कोयलारी येथील आश्रमशाळा अपघाताची चौकशी करून पाच लाख
रुपयांची आर्थिक मदत पीडितांना देण्यात यावी, ओव्हरलोड राख व कोळसा वाहतूक बंद करण्यात यावी, माविममध्ये काम करणाऱ्या महिला सीआरपी व लेखापालांच्या मानधनात वाढ करण्यात यावी, जिल्हा परिषदेच्या योग शिक्षकांचा मानधन निधी तत्काळ उपलब्ध करून देण्यात यावा आदी मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे. जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर यांच्या नेतृत्वात सुरू झालेल्या या आंदोलनात परिसरातील शेतकरी, दिव्यांगबांधव, महिला, भूमिहीन कामगार सहभागी झाले आहेत. यावेळी दीक्षा विजय पटले हिने शेतकऱ्यांच्या मुलींच्या भावना शब्दात मांडत शासनाच्या उदासीनतेवर टीका केली.
👉 *तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार*
जोपर्यंत शेतकरी, दिव्यांग व भूमिहीन मजुरांसाठी शासनस्तरावर ठोस निर्णय घेतले जात नाहीत, तोपर्यंत हे अन्नत्याग आंदोलन मागे घेतले जाणार नाही.-
महेंद्र भांडारकर जिल्हाध्यक्ष प्रहार जनशक्ती