गोंदियाची ओसाड जमीन होणार हिरवेगार सामाजिक वनीकरण व वनविभाग शेकडो हेक्टर जमिनीवर लागवड करणार ३ लाख रोपटे

         लोकशाही एक्सप्रेस गोंदिया 
वृक्ष तोडीमुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे, जे भविष्यातील मोठ्या संकटाचे संकेत आहे. पर्यावरण वाचवण्यासाठी वन विभाग आणि सामाजिक वनीकरणाने गोंदियातील शेकडो हेक्टर जमिनीवर विविध प्रजातींची ३ लाखांहून अधिक झाडे लावण्याचे नियोजन केले आहे. 
यासाठी सामाजिक वनीकरण आणि वन विभागाने शेकडो हेक्टर ओसाड जमिनीवर ३ लाखांहून अधिक खड्डे खोदून पर्यावरण  वाचवण्याचा सन्देश गावागावात पोहोचवीण्याचा प्रयत्न केल्या जात आहे.
जिल्ह्यात नव्हे तर अख्या देशात विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली जात आहे. विविध प्रकल्पांसाठी ही शेकडो हेक्टर जमीन संपादित करून हिरवळ नष्ट केली जात आहे. पर्यावरण असंतुलित होण्याचे हे एक मोठे मुख्य कारण आहे. एकट्या गोंदिया जिल्ह्यात ४२ टक्के क्षेत्र जंगलाने व्यापलेले आहे, परंतु केवळ गोंदियाच्या हिरवळीने राज्यातील असंतुलित झालेल्या पर्यावरनाला थांबवता येणार नाही. पृथ्वीची हिरवळ व पर्यावरणाचा चांगला समतोल राखण्यासाठी, यावर्षी वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागाने शेकडो हेक्टर क्षेत्रावर ३ लाखांहून अधिक रोपे लावण्याची योजना आखली आहे. या संदर्भात, सामाजिक वनीकरण विभागाने माहिती दिली की यावर्षी पावसाळ्यात सुमारे २ लाख रोपे लागवड करण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. ज्यामध्ये अभिसरण योजना आणि मनरेगा योजना समावेश आहे. त्याचप्रमाणे, वन विभागाकडून सुद्धा १०० हेक्टर क्षेत्रावर विविध प्रजातींची १ लाखांहून अधिक रोपे लावण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. पर्यावरणाचा संदेश सर्वांपर्यंत पोहचवा म्हणून  ५ जून रोजी पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम यासह विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. 
       सामाजिक वनीकरण व वन                    विभागाकडून आव्हान 
पर्यावरणाला संतुलित राखण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने झाडे लावणे गरजेचे आहे.  ज्याप्रमाणे सामाजिक वनीकरण व वन विभागाच्या वतीने झाडे लावून त्यांचे संरक्षण केले जात आहे. त्याचप्रमाणे नागरीकांनी सुद्धा विविध आयोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने रोपटे लावून त्यांचे संरक्षण करावे असे आव्हान सामाजिक वनीकरण विभागाचे सहाय्यक उपवनसंरक्षक प्रकाश तडस व वन विभागाचे उपवनसंरक्षक प्रकाश डोंगरवार यांनी केले.