लोकशाही एक्सप्रेस गोंदिया
गोंदिया तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मासेमारीसह जलाशय शेतीच्या सिंचनासाठी देखील उपयुक्त आहेत. या जलाशयांचा मोती उत्पादनासाठी देखील वापर होवू शकतो, हे ओळखून एव्हरग्रीन सोशल असोसिएशन तिरोडा या संस्थेने गोड्या पाण्यातून पर्ल शेतीला सुरवात केली.त्यास चांगलेच यश आले असून पहिल्या मोत्यांच्या पीकातून गणेशाची प्रतिकृती साकारण्यात आल्याने आनंद व्यक्त केला जात आहे.
नागपूर येथे झालेल्या २०२४ या वर्षी अॅडव्हांटेज विदर्भ प्रदर्शनात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापर्यंत या संकल्पनेची माहिती पोहोचवण्यात आली. या शेतीमुळे रोजगाराची संधी वाढणार असून, पाण्याचे शुद्धीकरण, पर्यावरणाचे संतुलन, हस्तकलेचे उत्पादन आणि निर्यातक्षम उद्योग यामध्येही मोठी भर पडणार आहे.“शिंपल्यातून मोती मिळतो, पण प्रयत्नातून यश मिळते” या उक्तीला खरं करत तिरोडा येथील एव्हरग्रीन सोशल असोसिएशनने मोती शेतीच्या क्षेत्रात अभूतपूर्व यश संपादन केलं आहे. विशेष म्हणजे या संघटनेने तयार केलेला पहिला मोती गणेशाच्या आकृतीचा असून, तो शुद्ध गोड्या पाण्यात तयार करण्यात आला आहे. गोंदिया जिल्ह्यातील हा पहिला आणि ऐतिहासिक मोत्याचा पीक असल्याने या उपक्रमाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.मोठ्या प्रमाणावर गोड्या पाण्याचे तलाव, विहिरी आणि जलसाठे उपलब्ध आहेत. या नैसर्गिक संपत्तीचा सकारात्मक उपयोग करत एव्हरग्रीन सोशल असोसिएशनचे संस्थापक सुबोध बैस व त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या सहा वर्षांपासून संशोधनात्मक काम सुरू केले. सुरुवातीला अनेक अडचणी, आर्थिक चणचण, पाण्याचे नियोजन, योग्य शिंपले निवडणे यांसारख्या समस्या आल्या. मात्र या सर्व अडथळ्यांवर मात करत त्यांनी सीता संस्थेकडून घेतलेले प्रशिक्षणाचा आधारावर अभ्यास आणि प्रत्यक्ष तलावातील प्रात्यक्षिक यांचा समन्वय साधत २०२५ मध्ये पहिले पीक घेण्यात यश मिळवले.
👉पर्ल शेती म्हणजे काय?
मोती तयार करण्याच्या प्रक्रियेला पर्ल कल्टिव्हेशन किंवा पर्ल फार्मिंग म्हणतात. यात गोड्या अथवा खाऱ्या पाण्यातील विशिष्ट प्रकारच्या शिंपल्यात कृत्रिमरित्या न्यूक्लियस (बीज/आधार) ठेवून, काही महिन्यांत त्याभोवती मोती तयार होतो. ही प्रक्रिया वेळखाऊ आणि कौशल्यपूर्ण आहे. शिंपले पाण्यात सातत्याने ठेवावे लागतात, तापमान, स्वच्छता आणि पोषण यांचे काटेकोर व्यवस्थापन आवश्यक असते.