कंपोस्ट खड्डा भरू, आपले गाव स्वच्छ ठेवू"एक मे पासून मोहीम : १३८ दिवसांचा कालावधी; सर्व ग्रामपंचायतींचा सहभाग. लोकशाही एक्सप्रेस न्यूज नेटवर्क गोंदिया

लोकशाही एक्सप्रेस न्यूज नेटवर्क गोंदिया 
                भरत घासले 
गोंदिया, ता. २९ : गावात दृष्यमान शाश्वत स्वच्छता ठेवण्यासाठी येत्या एक मे पासून संपूर्ण जिल्ह्यात "कंपोस्ट खड्डा भरू, आपले गाव स्वच्छ ठेवू"  ही मोहिम राबविण्यात येणार आहे. गावातील सर्व नागरीकांनी या मोहिमेत सहभागी होवून आपले गाव स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरूगानंथम यांनी केले आहे.
राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या आदेशानुसार घनकचरा व्यवस्थापनात सुधारणा व पर्यावरणपूरक उपाययोजना करण्यासाठी, कचरा कमी करणे, त्याचा पुनर्वापर करणे व त्यावर प्रक्रिया करण्याकरिता १ मे ते १५ सप्टेंबर पर्यंत एकूण १३८ दिवस ही मोहीम राबविण्यात येणार आहे. उल्लेखनीय म्हणजे गोंदिया जिल्ह्यातील 886 गावे आहेत. घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत या गावात  3317 नाडेप टाके तयार करण्यात आले. मोहीमेच्या कालावधीत गावातील नाडेप टाक्यात ओला कचरा टाकून त्यातून सेंद्रीय खताची निर्मीती केली जाणार आहे. उपक्रम राबविण्याच्या सूचना सर्व गटविकास अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून सर्व ग्रामपंचायतीपर्य़ंत माहीती पाठविण्यात आली असल्याचे पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री आनंदराव पिंगळे यांनी सांगितले. 
*स्वतंत्र संपर्क अधिकारी होणार नियुक्त*
मोहिमेच्या प्रारंभाकरिता प्रत्येक गावांसाठी तालुकास्तरीय अधिकारी कर्मचारी यांची स्वतंत्र संपर्क अधिकारी नियुक्त केले जाणार आहे. तसेच गावस्तरावर केलेले कामांची जिल्हा व तालुकास्तरावरून पडताळणी करण्यात येणार आहे. मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करून जिल्ह्यातील गावात दृष्यमान शाश्वत स्वच्छता ठेवण्यासाठी मोहिमेबाबत गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. दरम्यान त्यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत अधिकारी यांची कार्यशाळा घेण्यात आली.
*मंत्री महोदयांचे आवाहन*
उपक्रमात लोकप्रतीनिधींनी सहभाग घ्यावा यासाठी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहनांचे पत्र जिल्ह्यातील राज्यसभा व लोकसभेचे खासदार, सर्व आमदार तथा गावातील सर्व सरपंच यांना पाठविण्यात आले आहे.  संबंधित लोकप्रतिनिधी त्यांचे तालुक्यातील गावात जाऊन मोहिमेचा शुभारंभ करण्याचे आवाहनही  पत्रातून करण्यात आले आहे.
उपक्रमाचा कालावधी
१ मे २०२५ ते १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत एकूण १३८ दिवस ही मोहीम चालणार आहे. १ में रोजी शुभारंभ केल्यानंतर १० मे पर्यंत नाडेप टाक्यात भरण्यात येणार आहेत. ११ मे पासून ३० ऑगस्टपर्यंत प्रक्रिया, देखभाल आणि पडताळणी. करण्यात येणार आहे. १ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर या कालावधीमध्ये नाडेप कड्याचा उपसा केला जाणार आहे.
मोहिमेचा फायदा
गावांमध्ये नाडेप कपोस्टिंगचा स्वीकार वाढेल.
घनकचरा व्यवस्थापनात सुधारणा होईल. पर्यावरणपूरक उपाययोजना करण्यासाठी कचरा कमी करणे, कचऱ्याचा पुनर्वापर करण्यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखता येईल. शिवाय ग्रामस्थांचा स्वच्छता कार्यक्रमात सक्रिय सहभाग वाढेल.
अशी भरावी टाकी 
नाडेप टाकीच्या तळाला पाणी शिंपडून गवताचा पातळ थर द्यावा. त्यावर ओला कचऱ्याचा ३ ते ४ इंचाचा जाड थर टाकावा. यानंतर त्यावर शेण पाण्यात मिसळून शिंपडावे. त्यावर २ इंच बारीक मातीचा थर टाकावा. अशी प्रक्रिया पाच ते सात वेळा करावी. शेवटी टाकीच्या वर दीड फूट उंचीचा डोम तयार करावा. आणि त्याला शेणाच्या घट्ट मिश्रणाने लिंपण्यात यावे. १०० ते १२० दिवसांनंतर खताची निर्मीती झाल्यावर नाडेप टाकीच्या उपसा करावा.